महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि आपल्या ओके… या डायलॉगने प्रसिद्ध झालेल्या शहाजी पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता अमोल मिटकरींनी त्यांच्या शैलीत उत्तर देत शहाजी पाटलांवर पलटवार केला आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत, अशी बोचणारी टीका त्यांनी शहाजी पाटलांवर केली आहे.
“सध्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. त्यामुळे त्यांनी माझी काळजी न करता शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे, याची काळजी घ्यावी. शिंदे गटात तुम्ही सध्या कितीही डायलॉगबाजी केली. तरी, तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्री हे पदही भेटणार नाहीये. तुमची शेवटीचं टर्म आहे ही”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, गणपती स्थापनेवरुन मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही नाव न घेता टीका केलीये. यंदा पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, ‘काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात. मात्र, मी पूर्ण दहा दिवसाचा गणपती बसवतो’.
राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. ढोल ताशाच्या गजरात मिटकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन आगमन झाले. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सुरु आहे. नेमका काय आहे प्लॅन राष्ट्रवादीचा बंडखोरांसाठी या संदर्भात त्यांना विचारले असता, असे लोक आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.