महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थानामध्ये पुणे दोन क्रमांकाचे शहर असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी राबविलेले वेगवेगळे उपक्रम फायदेशीर ठरले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत टोळ्यांविरूद्ध केलेल्या मोक्का कारवाया, एमपीडीएनुसार स्थानबद्धता, रायझिंग गँगचा बिमोड, अल्पवयीन गुन्हेगारांचे समुपदेशनामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार 2021 मध्ये पुणे हे हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर ठरले आहे. अहवालानुसार कोलकाता हे सर्वात सुरक्षित शहर असून तेथे दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी प्रति एक लाख लोकसंख्येवर 103.4 आहे. तर पुण्यात गुन्ह्यांची संख्या 256.8 आहे. तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर म्हणून हैद्राबादने गौरव प्राप्त केला असून त्याठिकाणी गुन्ह्यांची संख्या 259.9 एवढी आहे. पुण्यात महिला सुरक्षिततेसह कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून राबविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रम फायदेशीर ठरले आहेत.
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूतीसाठी मागील दोन वर्षांपासून पोलीस ठाणे स्तरावर सराईतांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हद्दीतील कुप्रसिद्ध गुंड, रायझिंग गँग, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची यादी बनवून प्रतिबंधात्मक कारवाईला गती दिली होती. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत झाली आहे. विशेषतः सराईतांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कास्त्र उगारत त्यांचा सफाया केला आहे. त्याशिवाय खंडणीखोर, अवैध सावकारी मोडीत काढण्यासाठी थेट गुन्हे दाखल केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाकडून दंडुका उगारण्यात आला. त्यासह गुन्हे शाखेकडून ऑपरेशन ऑलआउट, गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे.
एनसीआरबीए अहवाल (प्रतिएक लाख लोकांमागे गुन्ह्यांची संख्या)
कोलकाता 103.4
पुणे 256.8
हैद्राबाद 259.9
कानपूर 336.5
बंगळुरू 427.2
मुंबई 428.4
पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्राधान्य दिले आहे. मागील दोन वर्षांपासून सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाई, दादागिरी -भाईगिरी करणाऱ्यांची स्थानबद्धता, शालेय मुली, महिलांची सुरक्षितता, खंडणीखोर सावकरांविरूद्धची मोहिम, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे स्तरावरील प्रयत्नांमुळे गुन्ह्यांचा आलेख कमी झाला आहे. एनसीआरबीए अहवालानुसार पुणे सुरक्षिततेच्या बाबतीत दोन क्रमांकाचे शहर ठरल्याने आनंद वाटला.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर