महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून मुंडे समर्थकांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पंकजा यांना ना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली ना मंत्रिमंडळात स्थान. त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महत्त्वाचं विधान केलं आहे.
महादेव जानकर यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत चर्चा करताना महत्त्वाच्या दोन विषयांवर भाष्य केलं.
‘पंकजा ताई भाजप सोडणार नाही. त्या भाजपमध्येच राहतील. त्यांच्या वडिलांनी देखील हयात या पक्षात घालवली आहे. त्यामुळे त्या कुठल्याही अन्य पक्षात जाणार नाही. प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच’, असं म्हटलं आहे.
‘रासप’ला कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी यापूर्वीच केली असल्याचे जानकर म्हणाले. आम्ही एनडीएत आहोत. त्यांच्या मित्रपक्ष म्हणून आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील प्रस्ताव देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचंही ते म्हणाले.