महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ सप्टेंबर । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पाऊण तास त्यांच्यात खलबतं झाली. यावर ”हो मी राज ठाकरेंची भेट घेतली. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आणि राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो. आमची राजकीय चर्चा झाली नाही ही भेट राजकीय नव्हती.” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची आज भेट घेतली. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना भेटण्याचा सपाटा लावला. यामुळे राज्यात नवीन समिकरणे जुळण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता याच शक्यतेत आता आणखी भर पडली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर आनंदाचे वातावरण आहे. याचनिमित्ताने मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्याकडे मी गेलो. तेथे गणपतीचे दर्शनही घेतले. बाकी काहीच नाही. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. मागे त्यांची शस्त्रक्रिया घेतली. त्यानंतर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. शस्त्रक्रियेनंतर तेव्हाच भेट घेणार होतो पण जमले नाही.
राजकीय चर्चा झाली नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्यात राजकीय चर्चा काहीच झाली नाही, त्यामुळे राजकीय नांदी आणि राजकीय समीकरण जुळवले असे म्हणता येणार नाही. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते त्यामुळे त्यांना भेटलो.