महाराष्ट्र २४ ऑनलाईन -। विशेष प्रतिनिधी । वॉशिंग्टन । करोनाची जीवघेणी साथ जगभरात फैलावण्यास चीनच कारणीभूत आहे असा आरोप सातत्यानं करणाऱ्या अमेरिकेनं आता चीनकडून नुकसानीची भरपाई घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘आमच्या नुकसानीची चीनकडून आम्ही मजबूत वसुली करणार आहोत. मात्र, त्याचा अंतिम आकडा अद्याप ठरलेला नाही,’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
करोना व्हायरसच्या साथीसाठी चीन जबाबदार असल्याचं आता जवळपास जगातील सर्व देशांचं मत झालं आहे. त्यामुळंच चीनकडून आर्थिक भरपाई वसूल करण्याचा काही देशांचा विचार सुरू आहे. जर्मनी चीनकडून १६५ अब्ज डॉलरची भरपाई मागणार असल्याचं तेथील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आहे. अमेरिका देखील असा काही विचार करतेय का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला असता त्यांनी त्याबद्दल थेट काही बोलण्याचं टाळलं. मात्र, चीनवर कठोर शब्दांत टीका केली.