महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांच्या यादीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं आहे. जवळपास दीड वर्ष ही नियुक्ती रखडली होती, त्यानंतर सत्तापालट होताच शिंदे जुनी यादी रद्द करुन नवी नावे सादर करतील, अशी अटकळ बांधली जात होती, ती अखेर खरी ठरताना दिसत आहे.
एका शासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील राजकीय नेतृत्व बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला नावांचा प्रस्ताव मागे घेतला जात आहे. “मविआ सरकारने १२ नावांची यादी राजभवनाला सादर केली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने ही यादी मागे घेत राज्यपालांना नवीन यादी सादर करण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्यपालांना नवीन यादी सादर करण्याचे सर्वाधिकार मंत्रिमंडळाने शिंदेंना दिले आहेत” असेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती. १२ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्रिमंडळाने विविध क्षेत्रातील 20 प्रतिष्ठित व्यक्तींची यादी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी कोश्यारी यांना सादर केली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने, कोश्यारी त्याला मान्यता देतील आणि १२ नामनिर्देशित व्यक्तींची नावे जाहीर करतील, असे मानले जात होते. परंतु कोश्यारी आणि मविआ सरकारमध्ये मतभेद असल्याने नियुक्त्यांवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
खरं तर, मविआ सरकारच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांनी या नियुक्तीबाबत दबाव आणण्यासाठी राज्यपालांना वैयक्तिकरित्या दोनदा बोलावले होते, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये राज्यपालांनी या प्रकरणावर वाजवी कालावधीत आपला निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती.