‘ऑक्टोबर हिट’ यावर्षी सप्टेंबरमध्येच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । यावर्षी पाऊस शेतकऱ्यांना चकवा देत असून ऑगस्ट महिन्यात केवळ ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत असून ऑक्टोबर हिट सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवू लागल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.

यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा असताना जूनमध्ये १०६ मिलिमीटर, जुलैमध्ये १४० मिलिमीटर, ऑगस्टमध्ये केवळ ५८ मिलिमीटर असा एकूण ३०४ मिलिमीटर पाऊस पावसाळ्याच्या तीन महिन्यांत झाला. आता पावसाचे आणखी काही दिवस शिल्लक आहेत. झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. २०१५ मध्ये या भागात केवळ ३१४ मिलिमीटर पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. त्याचीच आठवण आता होत असून येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.

पावसाचा खंड, अपुरा पाऊस यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली असून सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी यासारख्या पिकांचे उत्पादन निम्म्याने घटणार असून अजून पुढील कालावधीत काय होणार? त्यावर उरलेसुरले उत्पन्न अवलंबून राहणार आहे. शेतकऱ्यांच्या नजर आता आकाशाकडे लागून आहेत. या भागात अजूनही चांगला व दमदार पाऊस झाला नसल्याने नदी- नाले, विहीर, तलाव कोरडेठाक असून नदी-नाल्यांना या पावसाळ्यात अजून एकदाही मोठा पूर आलेला नाही. जर येणाऱ्या आगामी काळात चांगला व दमदार पाऊस झाला नाही तर पिके धोक्‍यात येऊ शकतात. सप्टेंबरच्या सुरुवातीला या भागात दमदार पाऊस पडेल असा अंदाज होता. पण पाऊस चकवा देत आहे. कुठे पडतो तर कुठे नाही. तसेच सकाळच्या वेळी कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत असून ऑक्टोबरमध्ये येणारी ‘हिट’ सप्टेंबरच्या सुरुवातीला जाणवू लागली आहे. याचीही फटका पिकांना बसत असून शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *