महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । तेलंगणा राज्यातील एका गावात असलेल्या रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचे पाहून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चांगल्याच भडकल्या. पंतप्रधानांचा फोटो दुकानातून का गायब आहे, असा सवाल करत त्यांनी अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो दुकानात लावा, असे निर्देशच दिले.
भाजपच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत तेलंगणाच्या दौऱ्यावर असलेल्या निर्मला सीतारमन यांनी रेशन दुकानात मोदींचा फोटो नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘बाजारात एका किलो तांदळाची किंमत 35 रुपये आहे. तो तुम्हाला 1 रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार 30 रुपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त 4 रुपये खर्च देते. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये मोदींचे फोटो लावत नाही, असा संताप व्यक्त केला.