‘रामदेव बाबा एक तोतया व्यापारी संत’ : शिवसेनेची जळजळीत टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । मुख्यमंत्री शिंदे हे हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर शिवसेनेने जळजळीत टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे की, रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला व त्याने शिंदेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार जाहीर केले. बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे.

असे चाळे खपवून घेणार नाही

शिवसेनेने म्हटले आहे की, भाजप एखादा नाट्यप्रवेश रचतो व त्यानुसार पात्रे रंगमंचावर येतात व डायलॉग बोलून जातात. उद्या हे तोतया बाबा काश्मिरात जाऊन गुलाम नबी आझादांना भेटतील व जाहीर करतील, ‘‘तुम्हीच खरे राष्ट्रपुरुष व गांधी नेहरूंचे वारसदार!’’ राहुल गांधी सत्तेवर येत आहेत अशी चाहूल या बाबा लोकांना झाली तर ते सोनिया गांधींना राष्ट्रमाता व राहुलना नवे पंडित नेहरू म्हणून घोषित करतील. श्री गणेशाच्या उत्सवात हे असे चमचेगिरीचे ‘मेळे’ महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

बाबागिरीचा जादुटोणा नष्ट व्हावा

कधीतरी याच बाबाने ‘मातोश्री’वर येऊन श्री. उद्धव ठाकरे यांनाही हिंदुत्वाचे खरे तारणहार असे प्रमाणपत्र बहाल केले होते, अशी आठवणही शिवसेनेने करून दिली आहे. पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, हेच बाबा दिल्लीतील एका आंदोलनात मध्यरात्री ‘साडी-चोळी’ घालून मुलींच्या पंजाबी वेशभूषेत पळून गेले होते. हे भगोडे महाराष्ट्रात येऊन पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करतात हा महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे. महाराष्ट्रातील या बाबागिरीचा जादुटोणा या गणेशोत्सवात नष्ट व्हावा. श्री गणेशचरणी महाराष्ट्राचा हाच नवस आहे.

पालखीचे भोई कोण?

शिवसेनेने म्हटले आहे की, ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्या महाराष्ट्राचे सार्वजनिक महत्त्व संपवले जात आहे. महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी. वीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पहिले सरसंघचालक येथेच निर्माण झाले. त्या महाराष्ट्रात तोतयांचे हिंदुत्व मखरात बसवून पालखीत मिरवले जात आहे. पालखीचे भोई कोण हे काय श्री गणेशाला माहीत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *