राजकीय उलथापालथ ; काँग्रेसला मोठे खिंडार पडणार ? अशोक चव्हाणांसोबत किती आमदार सोडणार ‘हात’?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहे. जर अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य होऊन एक महिना होत नाही तोच आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका ठिकाणी भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी दोन नेते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. तसंच अशोक चव्हाण यांच्यासोबत तीन नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते.

विशेष म्हणजे, दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर भाजपकडून प्रयत्नांना सुरुवात झाली आहे, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केला. सेनेतून बाहेर पडण्याची हालचाल शिंदे आधीपासून सुरू केली होती. तर काँग्रेसच्या बळावर राज्यात सत्ता येणे कठीण असल्याचे चव्हाणांना जाणवू लागले होते. सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या भूमिकेतून भाजपकडे चर्चेसाठी डाव टाकला. हे कळताच दिल्लीतून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबंध होते. आणि दोन्ही नेते मुळ काँग्रेसचेच. त्यामुळे बोलणी करायला आणखी सोपे झाले, असं वृत्त दिव्य मराठीने दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *