महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । भक्ताला 14 वर्षांसाठी वाट पाहायला लावणाऱ्या तिरुपती मंदिर संस्थानाला ग्राहक न्यायालयाने 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. तामिळनाडूच्या सलेम येथील ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
तामिळनाडू येथील एका भक्त के. आर. हरि भास्कर यांनी तिरुपती मंदिरात वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी तारीख मागितली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना तारीख मिळत नव्हती. कोरोना महामारीमुळे 2020मध्ये 80 दिवस मंदिर बंद होतं. त्यामुळे मंदिरात होणारी वस्त्रालंकारासह अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच दरम्यान भास्कर यांच्या सेवेची तारीख होती. पण, सेवा बंद राहिल्यामुळे त्यांना सेवा देता आली नाही. त्यामुळे भास्कर यांना संस्थानाने पत्र पाठवलं.
या पत्रात मंदिराने भास्कर यांना विशेष दर्शनासाठी तारीख हवी असल्यास किंवा पैशांचा परतावा हवा असल्यास कळवण्यास सांगितलं होतं. तेव्हा भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी तारीख देण्याची विनंती केली. पण, संस्थानाने त्यांना सेवेची तारीख न देता पैसे परत घेण्यास सांगितलं.
त्यामुळे भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. ग्राहक लवादाने तिरुपती मंदिर संस्थानाला वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी एक वर्षाच्या आत नवीन तारीख द्या अन्यथा 50 लाख रुपये दंड भरपाई म्हणून भास्कर यांना देण्याचे आदेश दिले आहेत.