महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ सप्टेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी रात्री मुंबईत दाखल झालेत. आज ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहांचा हा मुंबई दौरा मानला जातो.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आता भाजपचा डोळा मुंबई पालिकेवर आहे. दरम्यान अमित शहा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
शहा आज सकाळी लालबागच्या राजाचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणपतीचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.
शहा आज भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मविआ सरकार असताना ते नेहमी राज्य सरकारवर विशेषत: शिवसेनेवर हिंदुत्वावरून टिकास्त्र करायचे. त्यामुळे आता अमित शहा राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
29 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन 200’ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.