कोश्यारींचा झटपट निर्णय ; पावणेदोन वर्ष रखडलेली विधान परिषदेची यादी सात दिवसात रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ सप्टेंबर । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांची यादी रद्द करण्यात आली आहे. ठाकरेंनी पाठवलेला प्रस्ताव मागे घेण्यासंदर्भात विनंती करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं होतं. अखेर पावणेदोन वर्ष रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रस्ताव सात दिवसात रद्दही करण्यात आला.

सत्तापालट होताच एकनाथ शिंदे जुनी यादी रद्द करुन नवीन नावे सादर करतील, अशी अटकळ आधीपासूनच बांधली जात होती, त्यासंदर्भात शिंदेंनी पत्र पाठवताच कोश्यारींनीही झटपट निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ नावांची बहुचर्चित यादी मुख्यमंत्री कार्यालयाला परत पाठवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून नव्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती. १२ नोव्हेंबर २०२० रोजी मंत्रिमंडळाने कला, साहित्य, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रातील १२ प्रतिष्ठित व्यक्तींची यादी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी कोश्यारी यांना सादर केली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने, राज्यपालही त्याला मान्यता देतील आणि १२ नामनिर्देशित व्यक्तींची नावे जाहीर करतील, असे मानले जात होते. परंतु कोश्यारींनी पावणेदोन वर्ष नियुक्त्यांवर कोणताही निर्णय घेतला नाही.

खरं तर, मविआ सरकारच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांनी या नियुक्तीबाबत दबाव आणण्यासाठी राज्यपालांना वैयक्तिकरित्या दोनदा बोलावले होते, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये राज्यपालांनी या प्रकरणावर वाजवी कालावधीत आपला निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *