![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. या महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच आता याच महामार्गावरील अपघाताची आणखी एक बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेन किलोमीटर 25.800 माडप बोगदा इथे मेजर अपघात झाला आहे. यात कारमधील 5 प्रवाश्यांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेल्या पाच प्रवाशांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. या तिघांनाही पनवेल येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला आहे.
या महामार्गावर सातत्याने अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी याचा महामार्गावर भीषण अपघात झाला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. यात विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला.
याशिवाय सोमवारीही याच महामार्गावर खालापूरजवळ दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये एकूण १२ प्रवासी जखमी झाले होते. हे दोन्ही अपघात खालापूर येथे झाले होते. सर्व जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या भागातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.
मेटेंच्या अपघातानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम (ITS) लावली जाणार आहे. जेणेकरून आपण सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवू शकतो. ट्रॉलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि याचा अपघातांचं प्रमाण घटण्यात कितपत फायदा होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.