महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटामध्ये (shinde group) सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवीन वळण मिळणार आहे. शिंदे गटाने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याची मागणी, शिंदे गटाने केली आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे. तसंच, सुप्रीम कोर्टानं त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीये संदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंतीही शिंदे गटाने केली आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. या वादावर 5 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. या प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
मुंबईमधील अंधेरी पूर्व भागामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे इथं निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटानेही या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षचिन्ह काय असणार असा प्रश्न शिंदे गटासमोर उपस्थितीत झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.