![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । पुणे जिल्ह्यात पनीर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील कारवाई केलेल्या कारखान्यांमधून लाखो रुपयांचा नकली पनीर जप्त करण्यात आला आहे. (Pune Fake Paneer) अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे कारवाई करण्यात आली आहे. येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारण्यात आला. यामध्ये नकली पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारगुडे यांनी केले आहे.