महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (Shivsena) 40 आणि 10 अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडावी लागली आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी एवढं मोठं बंड का केलं? उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पॉईंट कोणता होता, ठिणगी नेमकी कुठे पडली, याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
‘ट्रिगर पॉईंट विचारत असाल तर ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटायची आणि कोणीतरी शहीद व्हायचं. ही 50 लोकंच माझ्या मागे लागली होती,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची ठाकरेंची साथ सोडण्याची भूमिका स्पष्ट केली.
‘2019 ला महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला कौल दिला होता. बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही निवडणूक लढलो. पण निवडणुकांनंतर महाविकासआघाडीचा प्रयोग झाला. हा प्रयोग आमच्यातल्या अनेक आमदारांना मान्य नव्हता, पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही नेतृत्वाचा निर्णय मान्य केला,’ असं शिंदे म्हणाले.
‘महाविकासआघाडीमध्ये शिवसैनिकाला त्रास दिला जात होता. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं. आमच्याच मतदारसंघामध्ये जाऊन आमचे घटकपक्ष भूमिपूजन करत होते. बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व याची गळचेपी होत होती, हे आम्हाला जाणवत होतं,’ असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.
आमच्यावर 50 खोके वगैरे टीका करतात, पण आम्ही जी 50 लोक आहोत ती किती वर्ष शिवसेनेत आहोत. आम्ही 25-30, 40 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांचा अनुभव किती आहे? 50 खोके बोलतात त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. तसंच मुख्यमंत्री होण्यासाठी मी हा कार्यक्रम केला नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.