तुरुंग प्रशासनाने म्हटलं, “त्यांना भेटायचं असेल तर…”; उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत एक ऑगस्ट रोजी अटक केली आहे. पात्रा चाळ प्रकरणातील गैरव्यवहाराप्रकारणामध्ये ईडीने राऊत यांना अटक केली आहे. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत.

उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने, “त्यांना भेटायचं असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी” असे सांगितले आहे. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशाच पद्धतीने उद्धव यांना संजय राऊतांना भेटता येईल असं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात उद्धव यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिलं नव्हतं. उद्धव यांच्या तर्फे एका व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचं आहे असं सांगण्यात आलं. मात्र तुरुंग अधीक्षकांनी राऊत यांना भेटायचं असेल तर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेटावे मात्र ही भेट घेण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असं सांगण्यात आलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने फोनवरुन अनौपचारिक भेटीसंदर्भात विचारपूस केली होती. तुरुंग अधीक्षकांच्या रुममध्ये राऊत यांना भेटण्याची परवानगी द्यावी यासंदर्भात विचारणा झाली. मात्र अशाप्रकारे भेट देता येणार नाही. रितसर पद्धतीने परवानगी घेऊनच भेट घेता येईल असं सांगण्यात आलं.

तुरुंगातील मॅन्यूअलप्रमाणे केवळ रक्ताचं नातं असणाऱ्या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येतं. इतर कोणाला कैद्याला भेटायचं असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आता उद्धव ठाकरे राऊत यांची भेट घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *