ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ सज्ज ; आशिया चषकातील चुकातून काही बोध घेणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ सप्टेंबर । आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतरही आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज असल्याचे कर्णधार रोहित शर्माने ठामपणे सांगितले. विश्वचषकापूर्वी संघात फार बदल होणे अपेक्षित नसले, तरी काही प्रश्नांची उत्तर शोधणे गरजेचे आहे, असेही रोहितने स्पष्ट केले.

आशिया चषकाच्या ‘अव्वल चार’ फेरीत भारताला पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या पराभवांची फारशी चिंता नसून आगामी काळात संघात मोठे बदल होण्याची शक्यता नसल्याचे रोहितने सांगितले.

‘‘आमचा संघ ९०-९५ टक्के निश्चित झाला आहे. केवळ काही बदल होऊ शकतील. आम्हाला आशिया चषकात काही प्रयोग करून पाहायचे होते. या स्पर्धेपूर्वी आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरत होतो. त्यातही दुसरा फिरकीपटू हा अष्टपैलू होता. मात्र, मला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. आम्ही जर तीन वेगवान गोलंदाज, दोन प्रमुख फिरकीपटू आणि एका फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले, तर आम्ही यशस्वी ठरू शकतो का, हे मला पाहायचे होते. मात्र, यासह काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मला मिळालेली नाहीत,’’ असे रोहितने नमूद केले.

तसेच विश्वचषकासाठी संघाची निवड करण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नसल्याने आम्ही फार प्रयोग करणे योग्य ठरणार नाही, असेही रोहितने स्पष्ट केले. ‘‘लवकरच अशी वेळ येईल, जेव्हा आम्हाला संघ निश्चित करावा लागेल. या स्पर्धेनंतर आम्ही दोन ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहोत आणि त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करेपर्यंत आम्ही काही खेळाडूंना संधी देऊन पाहू शकतो. मात्र, आम्ही फार प्रयोग करणे टाळणार आहोत,’’ असे रोहितने सांगितले.

पंतच्या डावखुरेपणामुळे कार्तिक संघाबाहेर!

आशिया चषकातील साखळी फेरीत यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळाले होते, पण त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. असे असतानाही ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यांसाठी त्याच्याऐवजी डावखुऱ्या ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला. ‘‘आम्हाला मधल्या फळीत एक डावखुरा फलंदाज पाहिजे होता. त्यामुळे दिनेश कार्तिकला संघाबाहेर व्हावे लागले. मात्र, आम्ही त्याच्या कामगिरीने नाखूश नाही किंवा त्याला वगळलेले नाही,’’ असे रोहित म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *