Maharashtra State Monsoon : राज्यात पावसाचा जोरदार कमबॅक, अनेक राज्यांना पावसानं झोडपलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ सप्टेंबर । पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर (Pune Satara Raigad Nashik Ahmednagar Rains News) या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा अनेक ठिकाणी हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात काल सायंकाळपासून जोरदार (Mumbai Rain Update) पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडला. अजूनही मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाची संततधार सुरुच आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

कोकणातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विक्रमगड जव्हार मोखाडा भागात जोरदार पाऊस झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *