Sanjay Raut: राऊतांना जामीन मिळणार का ? आज सुनावणीची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ सप्टेंबर । संजय राऊत यांना गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आज जामीन मिळणार का? याकडे शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांच लक्ष लागलं आहे.

मुंबईतील पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. 8 दिवसांच्या कोठडीनंतर राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात केलं होतं. कोर्टासमोर ईडीने राऊत यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा राऊतांची रवानगी कारागृहात करण्यात आली. आर्थर रोड कारागृहात राऊतांना घरचं जेवण आणि औषधे देण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. त्यानंतर पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 5 सप्टेंबरला राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. राऊतांचा आर्थर रोडवरील कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *