![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होणार असून विसर्जन मिरवणूकीसाठी पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. अतीवरिष्ठ, वरिष्ठांसह अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलासह सुमारे साडेआठ हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. विशेषतः प्रमुख विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर पोलिसांचा खडा पहारा असणार असून सीसीटीव्हींचा वॉच राहणार आहे.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने यंदा गर्दीचे प्रमाण अधिक आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे तसेच राज्याच्या इतर भागातील नागरिक पुण्यात येत असतात. यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांचा साडेआठ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.
पुणे शहरात सातव्या, नवव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. तर, उर्वरीत गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन शेवटच्या दिवशी होत असते. यंदा शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.9) सकाळी विसर्जन मिरवणूकीला सुरवात होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह इतर प्रमुख रस्त्यावरून शेकडो मंडळाची मिरवणूक होत असल्याने मध्यवर्ती भागातील काही रस्ते देखील बंद असणार आहेत. यासाठी वाहतूक विभागाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड, शिवाजी रस्त्यांवर प्रामुख्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. आज (दि.8) दुपारपासून ते शनिवारपर्यंत (दि.10) हा बंदोबस्त राहणार असून याठिकाणी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वॉच टॉवर देखील उभारण्यात येणार असून चैन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे.
गणपती विसर्जन मिरवणूकीसाठी वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे साडेआठ हजार जणांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये राज्य राखील पोलीस बल, होमगार्ड यांचा देखील समावेश आहे – आर. राजा, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.