Weather Updates: राज्यभरात पाऊस धो-धो कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात थैमान घालायला सुरूवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाने जलमय झालेल्या पुण्यात आणखी दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग जमा झाले आहेत. या प्रदेशांसोबतच लगतच्या परिसरामध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणातही पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आज म्हणजेच 12 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना, तर 13 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, या तिन्ही दिवशी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.

या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. कोकण, मराठवाडा आणि दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील आणि बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.

12 आणि 13 सप्टेंबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर, किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *