महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करत जेतेपदाला गवसणी घातली. आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात १७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी जोरदार संघर्ष केला. मात्र, फिरकीपटू वानिंदू हसरंगाने एका षटकात तीन फलंदाजांना बाद केल्यामुळे श्रीलंकेने (Srilanka) आशिया कपच्या विजयाच्या दिशेने कूच केली. १७१ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघ १४७ धावांवर गारद झाला. त्यामुळे यंदाच्या आशिया करंडक स्पर्धेतील चषकावर श्रीलंकेने नाव कोरलं.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने पहिला धक्का दिला. श्रीलंकेची फक्त दोनच धावसंख्या झाली असताना शाहने कुसल मेंडीसला त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाकिस्तानच्या हारिस रौऊफने चौथ्या षटकात पथूम निसंकाला अवघ्या ८ धावांवरच तंबूत परतला. मात्र, त्यानंतर श्रीलंकेचा स्टार खेळाडू भानुका राजापक्षाने आक्रमक खेळी करत ४५ चेंडूत नाबाद ७१ धावा कुटल्या.
तर सहाव्या षटकात दनुष्का गुणतिलका बाद झाला. गुणतिलकालाने एकच धाव केल्याने श्रीलंकेला धावांची गती मंदावली. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. २१ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केल्यानंतर हारिस रौऊफने हसरंगाला बाद केलं. श्रीलंकेच्या फलंदाजांनी पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवलं. .
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची चांगली सुरुवात झाली नाही. मात्र, मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने या सामन्यात अर्धशतक झळकावले.
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रिझवानला फिरकपटू वानिंदू हसरंगाने १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीला बाद केले. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर खुशदिल शाहला बाद केले. हसरंगाने एकचा षटकात पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठविल्याने श्रीलंकेचं विजयाचं पारडं जड झालं. त्यामुळे श्रीलंकेने आरामात सामना खिशात टाकला. श्रीलंकेच्या या विजयामुळे संघाने तब्बल आठ वर्षांनी जेतेपदाला गवसणी घातली