देशात स्काय बस कधी सुरू होणार? नितीन गडकरी म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ सप्टेंबर । देशातील महानगरांमध्ये वाहतूक कोडींची समस्या दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. यावर तोडगा म्हणून हवेत उडणारी बस अर्थात स्कायबसकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भारतात स्कायबस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगळुरूमध्ये स्कायबसबाबत अभ्यास सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

“ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाही. जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्कायबसचा पर्याय उपयुक्त आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. दोन टेकड्यांमध्ये धावणारी २०० प्रवासी क्षमता असणारी स्कायबस फिलिपिन्समध्ये सुरू आहे. याच धर्तीवर भारतात स्कायबस सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. बंगळुरूमध्ये स्कायबस किंवा ट्रॉली बस सुरू केल्यास हा उपाय व्यवहार्य ठरेल का? याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी केले होते. या तज्ज्ञांचा अहवाल तीन महिन्यांमध्ये मिळणार आहे. या अहवालानंतरच भारतात स्कायबसबाबत पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *