महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस होत आहे. येत्या तीन दिवसांत तो कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांना ‘ऑरेंज ऍलर्ट’ जारी करण्यात आला आहे. परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून काही दिवस तीव्रता अधिक राहील, असे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, रायगड, रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, वर्धा आणि बुलढाणा या जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत सकाळच्या सुमारास ऊन येते आणि सायंकाळनंतर आभाळ भरून पाऊस सुरू होतो असे वातावरण आहे. नाशिक आणि पालघर जिह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे.
पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय
मान्सून पुढील तीन ते चार दिवस सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होशाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
पिकांसाठी पावसाबरोबर पुरेशा सूर्यप्रकाशाचीही गरज असते. परंतु गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. अशा वातावरणामुळे शेंगअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.