महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । रशियाची राजधानी मॉस्कोमधील मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या अर्धपुतळय़ाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
मॉस्को स्टेट लायब्ररीने हा उपक्रम हाती घेतला, मुंबई विद्यापीठानेसुद्धा यात सहभाग घेतला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी मोठे कार्य आयुष्यभर केले. वंचितांचा आवाज बनून त्यांनी काम केले. सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण तरीही इतके मोठे कार्य त्यांनी उभे केले.
एकही दिवस शाळेत न गेलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएचडी करतात. पृथ्वी ही शेषनागावर नाही तर श्रमिकांच्या डोक्यावर उभी आहे, हे सातत्याने ते सांगत. आज या ठिकाणी त्यांच्या स्मृती उभ्या राहत आहेत. हा त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचासुद्धा हा गौरव आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, विनय सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.