शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका , म्हणतो आमच्या खेळाडूंना….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या नाजूक स्थितीत आहे. देशावर मोठं आर्थिक संकट आहे. पाकिस्तानात वाढत्या आयातामुळे वित्तीय तूट वाढत चालली आहे. तसंच चालू खात्याचा तोटा देखील वाढत चालला आहे. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेत असंतुलितपणाचे लक्षण दिसून येत आहे. देश आर्थिक तंगीत असताना पाकिस्तानचं क्रिकेट बोर्ड तरी कसं अपवाद असणार..? बोर्डाची आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे. याकडेच बोट दाखवत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर टीका केलीये.

“पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर इलाजही करु शकत नाही. वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आपल्यावरील उपचारासाठी लंडनला गेला होता. पण त्याला स्वत:चे पैसे खर्च करुन जावं लागलं. राहण्यापासून खाण्यापर्यंत त्याला आपलेच पैसे खर्च करावे लागले. अगदी तिकीटाचा खर्चही त्याला स्वत: करावा लागला. यात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा रोल कुठेच नव्हता”, याच गोष्टीकडे शाहिद आफ्रिदीने लक्ष वेधलं.

एकीकडे दुसऱ्या देशातील खेळाडूंवर तेथील क्रिकेट बोर्ड लाखो रुपये खर्च करत असताना पाकिस्तानात मात्र खेळाडूंकडे लक्षही दिलं जात नसल्याची खंत शाहिद आफ्रिदीने बोलून दाखवली. मी आणि शाहिनने लंडनमधील डॉक्टरांना फोन केला, त्यांच्या अपॉइंटमेंट घेतल्या, त्यानंतर उपचार झाले, पण या सगळ्याची खबरही पाकिस्तानी बोर्डाला नव्हती, असंही शाहिद आफ्रिदी म्हणाला.

शाहीन शाह आफ्रिदीचे शाहिदच्या मुलीशी लग्न होणार आहे. शाहिद आफ्रिदीने गेल्या वर्षी आपल्या मोठ्या मुलीचे शाहिन आफ्रिदीसोबत लग्न होणार असल्याचे जाहीर केले होते. दोघांची एंगेजमेंट झाली असली तरी लग्नाची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये स्टार खेळाडू शाहीन आफ्रिदीचाही समावेश करण्यात आला आहे. शाहीन नुकताच दुखापतीतून सावरला आहे. नुकत्यात पार पडलेल्या आशिया चषकाला शाहिन मुकला होता. त्यावेळी तो दुखापतीमुळे त्रस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *