पुण्यात तरुणाची ‘मुळशी पॅटर्न’ करण्याची धमकी ; खंडणी ची मागणी ; तरुणाला अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । नामांकित दूरसंचार कंपनीची इंटरनेटची केबल टाकण्यासाठी कर्मचाऱ्याकडे दरमहा २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने इंटरनेट केबल टाकणाऱ्या कर्मचाऱ्याला ‘खंडणी न दिल्यास तुझे हात-पाय तोडून मुळशी पॅटर्न करीन’ अशी धमकी दिली होती.

गणेश रामकृष्ण ओझरकर (वय २३, ओझरकरवाडी, मुळशी) असं पोलीस कोठडी झालेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३६ वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान मुळशी तालुक्यातील कॉड्रोन आयटी पार्क परिसरात घडली. फिर्यादी हे नामांकित दूरसंचार कंपनीची इंटरनेट केबल जोडून देण्याचे, तसंच दुरुस्तीचं काम करतात.

आरोपी ओझरकर याने फिर्यादींच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे इंटरनेट केबल टाकण्याचं काम करण्यासाठी दरमहा २० हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली, तसंच ‘हप्ता न दिल्यास केबल व हात-पाय तोडीन आणि पुन्हा इथे आल्यास तुमचा ‘मुळशी पॅटर्न’ करीन,’ असे धमकावल्याचं फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ओझरकरला अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीने आणखी कोणाकडे खंडणी मागितली आहे का, त्याचे कोणत्या गुन्हेगारी टोळीसोबत संबंध आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *