येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ सप्टेंबर । गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे. आपल्यात निकोप स्पर्धा असून महाराष्ट्र गुजरातलाच नव्हे, तर कर्नाटकलाही मागे टाकणार आहे. उद्योग आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाऊन देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प राज्य सरकार मार्गी लावणार असून त्याद्वारे राज्य दहा वर्षे पुढे जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘फॉक्सकॉन’चा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी निकराचे प्रयत्न केले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लघुउद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य गुंतवणूक, उद्योगात मागे गेले आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले, असे नमूद करून फडणवीस म्हणाले, ‘‘आमच्या सरकारच्या काळात अनेक योजना सुरू केल्या आणि निर्णय घेतले गेल्याने २०१३ मध्ये परकीय गुंतवणुकीत पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. राज्यातील विदेशी गुंतवणूक सहा कोटी डॉलरवरून २०१७ मध्ये २० अब्ज डॉलरवर गेली होती आणि गुजरात, दिल्ली, तमिळनाडू या राज्यांमध्ये एकत्रित गुंतवणूक १३ अब्ज डॉलर होती. मात्र गेल्या दोन वर्षांत राज्याने पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या काळात २३ अब्ज डॉलर्सवर गेली आणि आपण १८ अब्ज डॉलर्सवर घसरलो.’’ केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन त्याच्यावर मात करता येत नाही, तर चांगल्या योजना आखाव्या लागतात, असेही फडणवीस म्हणाले. उद्योजक राज्यातील वातावरण काय आहे, हे बघत असतो. गुंतवणुकीची अपेक्षा करायची आणि प्रकल्पांना विरोध करायचा, असे चालत नाही. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक मोठी म्हणजे साडेतीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तेलशुद्धीकरण प्रकल्पातून होणार होती. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठा वाटा जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि मुंद्रा बंदराचा आहे. जामनगर प्रकल्पापेक्षा कोकणातील प्रकल्प तीन-चार पट मोठा होणार होता आणि वाढवण बंदरही मुंद्रापेक्षा मोठे होणार आहे. हे प्रकल्प वेळेत झाले असते, तर राज्य १० वर्षे पुढे गेले असते. पण या प्रकल्पांना राज्यात विरोध करण्यात आला. बुलेट ट्रेन, मेट्रो तीन प्रकल्प यांची कामे विरोधामुळे बंद पाडण्यात आली. तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्य सरकार आता पुन्हा मार्गी लावणार आहे, मात्र आता त्यातील गुंतवणूक साडेतीन लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होणार आहे. जेएनपीटी बंदर अपुरे पडत असल्याने वाढवण बंदर झाल्यावर ते मोठे फायदेशीर ठरेल आणि जगातील कोणतेही जहाज तेथे माल घेऊन येऊ शकेल. मच्छिमारांच्या समस्या असल्यास त्याही सोडविल्या जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षांत उद्योगांना असलेल्या विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी १० टक्के लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा आरोप फडणवीस यांनी केला. या भ्रष्टाचाराला पायबंद घातला जाईल, आमच्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात असले प्रकार नव्हते, असे त्यांनी नमूद केले.

आमचे सरकार सत्तेवर आल्यावर फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातऐवजी महाराष्ट्रात यावा, यासाठी निकराचे प्रयत्न केले, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये जाणार, हे निदर्शनास आल्यावर मी लगेच एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण केले आणि वेदान्ताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. गुजरातपेक्षा अधिक आकर्षक पॅकेज देण्याची तयारी दर्शविली. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारशी ‘फॉक्सकॉन’च्या चर्चा अंतिम टप्प्यावर पोचल्याने व आता परत फिरणे कठीण असल्याचे तसेच गुजरातबाबत निर्णय झाल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी ‘फॉक्सकॉन’ तयार असून संलग्न प्रकल्पांसाठी गुजरातमधील प्रकल्पापेक्षाही अधिक गुंतवणूक येथे होईल, असे अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

‘फॉक्सकॉनसाठी निकराचे प्रयत्न केले’

आमचे सरकार सत्तेवर आल्यावर फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातऐवजी महाराष्ट्रात यावा, यासाठी निकराचे प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत काहीच केले नाही, तुमचे कर्तृत्व काय आणि तुम्ही आम्हाला शहाणपणा काय शिकवता, असा टोला फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही..

गेल्या दोन वर्षांत राज्याने पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेले. तेथील तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या काळात २३ अब्ज डॉलर्सवर गेली. महाराष्ट्र मात्र १८ अब्ज डॉलर्सवर घसरला. केवळ गुजरातविरोधात भाषणे देऊन चालत नाही, आपल्या राज्यासाठी चांगल्या योजना आखाव्या लागतात. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *