युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा निर्धार ; इंच-इंच भूमी परत मिळवू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २३ सप्टेंबर । आपल्या देशावर केलेल्या आक्रमणासाठी रशियाला धडा शिकवून त्यांनी घेतलेली इंच अन् इंच भूमी परत मिळवण्याचा निर्धार युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बोलून दाखवला. संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या महासभेमध्ये दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी सर्व जगाला मदतीची साद घातली.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याची राखीव कुमक युक्रेनमध्ये उतरवण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच झेलेन्स्की यांचे भाषण झाले. शिवाय रशियाच्या हल्ल्यानंतर सर्व जगाला उद्देशून त्यांचे हे पहिलेच निवेदन होते. त्यामुळे ते काय बोलतात याबाबत सगळय़ांना उत्सुकता होती. ‘‘आम्ही आमच्या सर्व देशावर युक्रेनचा झेंडा पुन्हा फडकवू. आम्ही शस्त्रांच्या मदतीने हे करू शकतो, पण त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. परिणामांचा विचार न करता राष्ट्रे आपल्या महत्वाकांक्षा रेटू लागली तर या संघटनेचे (संयुक्त राष्ट्रे) अस्तित्वच धोक्यात येईल,’’ असे झेलेन्स्की म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत करोनाची जागा युक्रेन युद्धाने घेतल्याचे चित्र दिसले. करोनामुळे गेली दोन वर्षे महासभा प्रत्यक्षात भरली नव्हती. या काळात करोना साथ, प्रतिबंध हेच विषय सर्वाधिक चर्चेत होते. मात्र यंदाच्या महासभेत युक्रेनवर रशियाने लादलेल्या युद्धाची सर्वात जास्त चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक लहान-मोठय़ा देशांच्या प्रतिनिधींनी युरोपातील युद्धाबाबत चिंतेचा सूर लावला.

भारत, जपान, ब्राझिल आणि युक्रेन हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य का नाहीत? संयुक्त राष्ट्रांमध्ये मोठय़ा सुधारणांची गरज आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, बहुतांश आशिया, मध्य आणि पूर्व युरोप नकाराधिकारापासून दूर आहे. रशियाला मात्र सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान आहे, ते का?

– वोलोदिमीर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *