महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ सप्टेंबर । आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली. सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सावंत यांना समज द्यावी
मागच्या काळात तुम्हाला मंत्री व्हायचे होते. तेव्हा मराठा तरुण तुम्ही घेऊन जात होतात. समाजाच्या ताकदीचा उपयोग केला. याचा तुम्हाला विसर पडला का, असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा व गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिले आहे. सरकार कुणाचे आहे याचे समाजाला काहीही देण घेण नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी समाज रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे. त्याला आरोग्यमंत्री सावंत हिनवतात, अवमानकारक बोलतात हे न शोभणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विनोद पाटील
सावंत समाजासाठी कलंक
मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयक रेखा वाहटुळे म्हणाल्या की, मंत्री सावंत यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य करून ते समाजासाठी कलंक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या घाणेरड्या राजकारणाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. त्यांनी समाजाची तातडीने माफी मागावी. तर मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची त्वरीत मंत्री पदावरून हाकलावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
रेखा वाहटुळे
अवमानकारक बोलण शोभतं का?
मराठा समन्वयक तथा बुलंद छावाचे प्रदेश संघटक मनोज गायके म्हणाले की, मराठा समाजाचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाविषयी अपमान जनक वक्तव्य केले. त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो. ज्या सरकारने आरक्षण दिले ते का टिकले नाही? केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मराठा समाज आरक्षणाचा प्रश्नासाठी संघर्ष करत असेल तर चुकल कुठे? आमचा तो हक्क आहे. तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी अवमानकारक बोलण तुम्हाला शोभत का, असा सवालही त्यांनी केला.
शांतता भंग करू नका
आरोग्य मंत्र्यांना सामाजिक शांतता भंग करणे शोभत नाही. कोरोना काळातही आंदोलन सुरूच होते. मराठा आरक्षण मिळावे यासाठी सकल समाज आपआपल्या परीने आंदोलन करतच आहे. याची आरोग्यमंत्री सावंत यांना माहिती नाही. दुसरे राज्य व केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा व आंदोलन थांबवा. सरकारला हे का जमत नाही. कृती करण्याचे सोडून आरोग्य मंत्री बेताल वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करत आहेत. हे त्यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया रवींद्र काळे – पाटील, अशोक मोरे, सचिन मिसाळ यांनी दिली.