महाराष्ट्र २४ ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – शहरात कर्फ्यू लागू असताना देखील जीवनावश्यक वस्तू खरेदी वेळीही नागरिक नाहक गर्दी करताना दिसत आहे. नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरत आहेत. कारवाई केल्यानंतर देखील या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. पहिल्यापासून हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच हे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कडक उपाययोजना करून देखील त्यात काही फरक पडलेला नाही. भाजीपाला, किराणा आणि मेडिकलची दुकाने या भागात उघडी असायची. त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असत. त्यामुळे देखील रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळेच आता या परिसरात प्रशासनाकडून कडक पावले उचण्यात आली आहे. नागरिकांनीही पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी 1 मे ते 3 मे पर्यंत हे अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.
अतिरिक्त निर्बंध भाग
– समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याचा सर्व परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
– स्वारगेट पोलिस ठाण्याचा गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर व खड्डा झोपडपट्टी हे भाग असतील.
– लष्कर पोलिस ठाण्याच्या परिसरात नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भिमपूरा लेन, बाबाजान दर्गा आणि क्वार्टर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला रोड आणि शितलादेवी मंदिर रोड
– बंडगार्डन परिसरात ताडीवाला रोड या भागात हे निर्बंध असतील
– सहकारनगर पोलिस ठाणे-तळजाई वसाहत आणि बालाजी नगर या भागात हे निर्बंध असणार आहेत.
– दत्तवाडी भागात पर्वती दर्शन परिसर…
– येरवडा पोलिस ठाण्याच्या परिसरात लक्ष्मीनगर, गाडीतळ आणि चित्रा चौक परिसर
– खडकी पोलीस ठाण्याच्या परिसरात पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर आणि इराणी वस्ती पाटकर प्लॉट या भागात हे निर्बंध असणार आहेत.
पुढील तीन दिवस या भागात किराणा, भाजीपाला, अंडी, मटण, फळे, पूर्ण पणे विक्री बंद असणार आहे. या भागात दूध विक्री केंद्र फक्त दिवसभरात दोन तासासाठी म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुली असणार आहेत. तर घरपोच दूध देणार्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सेवा देता येणार आहे. त्यासोबतच दुधाच्या वाहतुकीस निर्बंध नसतील. शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यवाहिसाठी हे निर्बंध लागू होणार नाहीत.