महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । २०१९ तसेच २०२० मधील पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असून २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार पदांची मागणी पोलिस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या १० हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रालयातील समिती कक्षात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२६ सप्टेंबर) गृह विभागाची आढावा बैठक झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. बैठकीत वित्त विभागाचा आढावा घेण्यात आला. राज्यात अतिरिक्त साधनसंपत्ती निर्माण करून गुंतवणूक कशी येईल हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रीय सकल उत्पनाच्या (जीडीपी) साडेतीन ते चार टक्के गुंतवणूक ही भांडवली गुंतवणूक म्हणून झाली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची फॉक्सकॉनबाबत नौटंकी सुरू आहे. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाबाबत कार्यवाही झालेली नव्हती. आमचे सरकार आल्यानंतर त्यांना जागा दाखवली. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही झाली. प्रकल्प गुजरातला जात आहे हे समजताच आम्ही त्यांना जाऊन भेटलो, पॅकेजही दिले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. आता या प्रकल्पापेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणून आम्ही आघाडीच्या नेत्यांना उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.