लुटमारीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ; मुंबई – नाशिक महामार्गावरून जाताय ? गाडी थांबवू नका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । रात्री-अपरात्री रस्त्याच्या कडेला गाडीला कट मारली आहे… तुमच्या गाडीचा बॅंकेचा हफ्ता थकला आहे… आम्ही पोलीस आहोत तुमची कागदपत्रे तपासायची आहेत, असे सांगून वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीने मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांत धुमाकूळ घातला आहे. लुटमारीचे प्रकार रोखण्यासाठी नारपोली पोलिसांनी अॅक्शन प्लॅन आखला असून सतर्क झालेल्या पोलीस यंत्रणेने रात्रीची गस्त वाढवत नाक्यानाक्यांवर वाहनचालकांना लुटीपासून सावध राहण्याचे धडे देण्याची मोहिम आखली आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरून जाताना कोणत्याही परिस्थितीत गाडी थाबंवू नका, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

मुबंई – नाशिक महामार्गावरून येणारे शेतकरी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा ठाण्याच्या जांभळी नाका येथे भाजीपाला, फळ आदि विकून पहाटे परतीच्या प्रवासाला लागतात. शेतकऱ्यांनी माल विकून मिळवलेली रोख महामार्गावरील माणकोली, अंजूरदिवे, पिंपळनेर, पाइपलाइन रोडजवळ अज्ञातांकडून लुटण्याचे प्रकार सरार्स वाढले होते. या घटनांची गंभीर दखल घेत भिवंडी परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी वाहनचालकांच्या सतर्कतेसाठी विशेष पथक नेमले. या पोलीस पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन मार्गदर्शन सुरू केले. दुचाकीवरून येणाऱ्या महिला व पुरूष अंधारात महामार्गावर गाडीला कट मारली अथवा तुमच्या वाहनाचा बॅंक हफ्ता थकल्य़ाचे सांगून गाडी बाजूला घेतात. अवघ्या पाच मिनिटांत गाडीच्या सीटखाली ठेवलेली रोख चोरटे चाकूच्या धाकाने लुटून धूम ठोकतात. गाडीची काच खाली न घेता वाहने चालवावीत, असा सल्ला या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन शेलार यांनी व्हिडीओतून दिला.

असे प्रकार घडल्यास न घाबरता १००, ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *