कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू, विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – सुखरूपपणे घरी परतण्याचा प्रवास सुरू होतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान तरळू लागले होते. त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या एसटी बसेसचे चालक आदींनाही त्यांनी अभिवादन केले.राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राज्यातून गेलेले हे विद्यार्थी लॉकडाऊनपासून तेथे अडकून होते. त्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान शासनाच्या संपर्कात होते. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत प्रयत्नशील होते. या विद्यार्थ्यांचा प्रवास मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून होणार असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे संबंधित राज्याच्या यंत्रणांशी संपर्कात होते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी पाठविण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आज कोटा येथून रवाना झाल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले.याशिवाय एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना आणताना कोविड-19 च्या आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात येत आहे. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही करून विलगीकरणही करण्यात येणार आहे.

परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे 76 बसेस कोटा येथे पोहचल्यानंतर त्या आज तेथून विद्यार्थ्यांना घेऊन रवाना होत आहेत. दूर अंतराचा प्रवास असल्याने येत्या एक दोन दिवसांत हे विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित त्या-त्या जिल्ह्यांत पोहचणार आहेत. या दरम्यान महामंडळाने बसेसचे सॅनिटायझेशन, चालकांची पुरेशी संख्या, त्यांची विश्रांती अशा गोष्टींचेही पुरेसे नियोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *