एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टिझर पाहिला का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी पहिला टिझर लाँच करण्यात आली आहे. काहीवेळापूर्वीच सोशल मीडियावर सेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर शेअर करण्यात आला. यामध्ये पूर्वीच्या काळात दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर झालेली गर्दी, उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील ‘माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो’ ही ट्रेडमार्क लाईनही टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच शिंदे गटाप्रमाणे शिवसेनेनेही एक नेता, एक झेंडा, एक मैदान… ही टॅगलाईन वापरली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन टिझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

यंदा शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंचा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे होणार आहेत. दोन्ही गटांनी आपापला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. एकनाथ शिंदे गटाकडूनही काही तासांपूर्वीच त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लाँच करण्यात आला होता. टीझरमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील आवाजाचा वापर करत शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली होती. ‘शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सतत आसमंतात फडकत राहिला पाहिजे,’ या बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनाची आठवण टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *