शिवतारे-आढळरावांना चितपट करण्यासाठी बड्या नेत्याची सेनेत घरवापसी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर पुण्यात झालेली पडझड रोखण्यासाठी ठाकरेंना मोठी मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना हादरे बसले आहेत. त्यानंतर ठाकरेंनी जुन्या नेत्यांना पुन्हा साद घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले दांगट हे पक्षातील कुरघोड्यांना कंटाळून राजकारणापासून दूर गेले होते. काँग्रेसमध्ये ते फारसे सक्रिय नव्हते.

बाळासाहेब दांगट हे १९९० आणि १९९५ मध्ये जुन्नर तालुक्यातून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी होते. २००४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. काही दिवसांपूर्वी दांगट यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं होतं. परंतु आता त्यांनी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला आहे.

जुन्नरमध्ये पुन्हा भगवा फडकवण्याचा चंग ठाकरेंनी बांधल्यानंतर बाळासाहेब आणि बाजीराव दांगट हे दोन्ही बंधू `मातोश्री`वर गेले होते. त्यावेळीच त्यांनी शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे वचन दिले होते.

याशिवाय जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष ऊर्फ बाबा परदेशी, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल ढवळे, माजी उपसभापती (पंचायत समिती, खेड) अमोल पवार, खेड येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल येवले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, अविनाश करडिले, शरद चौधरी, जुन्नर शहर प्रमुख चंद्रकांत डोके, नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष आणि माजी जिल्‍हा प्रमुख सुनील मेहेर माजी नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक समीर भगत, नंदू तांबोळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *