महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आपापल्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. विजयादशमीच्या संध्याकाळी एकीकडे शिवाजी पार्क आणि दुसरीकडे बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही जवळपास एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की कोणाचे भाषण ऐकायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तुम्ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन, असे अजित पवार यांनी सांगितले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करेल. दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान यासंदर्भातही अजित पवार यांनी मत मांडले. मोठमोठे राजकीय मेळावे केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावलं जातं. तेव्हा अशा घटना घडत असतात. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन इर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.