Chhagan Bhujbal: देवीच्या दर्शनाला गेलेल्या छगन भुजबळांनी केली सरस्वतीची आरती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ ऑक्टोबर । शाळा, कॉलेजमधील देवी सरस्वतीचे फोटो काढून तिथे महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं विधान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नव्या वादाला तोंड फोडले होते. या विधानावरून चौफेर टीका झाल्यानंतरही भुजबळ यांनी भूमिकेवर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र याच भुजबळांनी नाशिकमधील कालिका देवीच्या मंदिरात दर्शनास हजेरी लावून तिथे आरती केल्याने चर्चेला उधाण आले आहे. भुजबळ यांनी कालिका देवीची आरती केली तिथेच सरस्वतीचीही मूर्ती असलेल्याने भुजबळांनी सरस्वतीची आरती कशी काय केली, असा सवाल विचारला जात आहे.

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिरामध्ये तीन देवींच्या मूर्ती असून, तिथे मध्यभागी कालिका देवी, एका बाजूला सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे. त्यामुळे कालिका देवीची आरती करतानाच भुजबळांनी कळत नकळत सरस्वतीचीही आरती केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मंदिरात दर्शन केल्यानंतर याबाबत विचारले असता छगन भुजबळ यांनी आपण सरस्वतीबाबत केलेल्या त्या विधानावर कायम असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, या मंदिरात सरस्वती मातेची मूर्ती आहे की नाही, याबाबत मला कल्पना नाही. कालिका माता ही नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मी येथे दर्शनाला आलो होतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी शाळा, महाविद्यालयांध्ये सरस्वतीच्या असणाऱ्या फोटोंना आक्षेप घेत छगन भुजबळ यांनी एक विधान केले होते. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. सरस्वतीने आम्हाला शिकवले नाही. आम्ही तिला कधी पाहिलं नाही. त्यामुळे शाळेत सरस्वतीच्या फोटोऐवजी महापुरुषांचे फोटो लावावेत, सरस्वतीने शिक्षण दिलं असेल तर ते ३ टक्के लोकांना दिलं असेल, असं विधान केलं होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *