महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ ऑक्टोबर । दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. असे असले तरी दसरा मेळावा बंदोबस्ताच्या आयोजनाबाबत स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक यांची उदासीनता अथवा पक्षपाती दृष्टिकोन निदर्शनास आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे.
शिवतीर्थावर शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय शिवतीर्थावर उसळणार आहे. त्यामुळे मेळाव्याला होणारी विराट गर्दी लक्षात घेता मुंबई पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबईत एकाच वेळी दोन ठिकाणी मेळावे होणार असल्याने स्थानिक व वाहतूक पोलिसांनी योग्य समन्वय साधून बंदोबस्त लावावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दसरा मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आता गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांना तत्काळ संपर्क साधून त्यांना 4 व 5 तारखेला दोन दिवस बंदोबस्तासाठी बोलवावे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.