महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ ऑक्टोबर । शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा पारंपारीक दसरा मेळावा होऊ नये यासाठी राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. तसेच मुंबईत वेगळा दसरा मेळावा आयोजित करून राजकारण करू पाहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मर्यादा ओलांडू नका, ते राज्याच्या हिताचे नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, अशा शब्दात खडेबोल सुनावत सबुरीचा सल्ला दिला आहे.
दसरा मेळव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता शरद पवार म्हणाले, खरे तर हे दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेच्या निकालाची सूत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहेत. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. असा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षालाही एक मर्यादा ठेवली पाहिजे. मर्यादा ओलांडून काही होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ते चांगल नाही, असे शरद पवार म्हणाले.
राज्याच्या जबाबदार लोकांनी तणावपूर्ण वातावरण दुरुस्त व्हावे, यासाठी पावले टाकली पाहिजेत. त्याची जबाबदारी राजकारणातील आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर तर आहेच, मात्र राज्यातील 14 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्याच्या प्रमुखांवर ही जबाबदारी अधिक आहे, असे सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. दसरा मेळाव्यात जी काही मांडणी होईल, त्यातून आणखी कटुता वाढू नये. उलट मर्यादा पाळत मांडणी केल्यास राज्याच्या राजकारणातील कटुता कमी होण्यास मदत होईल, असे पवार म्हणाले.