महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ ऑक्टोबर । राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. राज्यात अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे. सध्या परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातवरण तयार झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, आज हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यात पावासाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अल्रट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.