महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ ऑक्टोबर । वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं. बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शरद पवार यांनाही टोला लगावला. ते अकोल्यात बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यात जो मनाचा मोठेपणा होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये नाही, असं त्यांनी म्हटलंय. हे वक्तव्य करताना एक आठवणही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितली.
दादू इंदुरीकरांचं ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर बाळासाहेबांचा मोठेपणा दिसून आला होता. तो मोठेपणा मोदी आणि पवारांमध्ये नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राजकीय वैर न ठेवता बाळासाहेब ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवण्याचं मोठेपण बाळासाहेबांमध्ये होतं. ते मोदींमध्ये नाही आणि पवारांमध्येही नाही, असंही ते म्हणाले.
गुरुवारी अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 38व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. अकोला क्रिकेट क्लबवर भर पावसात प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी संबोधित केलं. दरम्यान, भर पावसातही त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनी गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
दादू इंदुरीकरांचं ‘गाढवाच लग्न’ या नाटकामध्ये इंदुरीकरांनी काही देवांची उडवली होती. तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आवाहन केलं की तुमचे नाटक होवू देणार नाही. तेव्हा इंदुरीकर म्हणाले माझं नाटक बघायला या आणि ते मला बंद करून दाखवा.
बाळसाहेब आले नाटकाला आणि त्या नाटकामध्ये इंदुरीकर असे म्हणाले की आज माझ्यासोबत ढाण्या वाघ बसलेला आहे. त्यानंतर बाळसाहेब उठले आणि त्यांनी दादू इंदुरीकरांना मिठी मारली. हा माझा तुला असणारा अधिकार आहे, असं ते म्हणाले. हा दिलदारपणा मोदीमध्ये आहे का शरद पवारांमध्ये आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.