महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते आजारी होते. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. या निमित्ताने मुलायम सिंह यादव यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…
आपल्या तरुणपणामध्ये मुलायम सिंह यादव यांनी पैलवानकीचीही आवड होती. ते आधी शिक्षक होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते राजकारणात आले. १९६७ साली सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर त्यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि सगळ्यात कमी वयाचे आमदार होत आपल्या राजकीय करियरची सुरुवात केली. १० वेळा आमदार आणि ७ वेळा खासदार झालेले मुलायम सिंह यादव देशाचे संरक्षणमंत्रीसुद्धा होते. या काळात त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे शहीदांच्या परिवारांना मोठा दिलासा मिळाला होता.
आज भारतीय सैन्यात वीरमरण आलेल्या सैनिकाचं पार्थिव शासकीय इतमामात त्याच्या घरी पोहोचवलं जातं. याचं श्रेय मुलायम सिंह यादव यांचंच आहे. स्वातंत्र्यानंतर इनेक वर्षे, जेव्हा सीमेवर जवानाला वीरमरण येत असे, तेव्हा त्याचं पार्थिव त्याच्या घरी पोहोचवलं जात नव्हतं. त्यावेळी अशा जवानाची टोपी त्याच्या घरी पाठवली जायची.
मात्र जेव्हा मुलायम सिंह यादव संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी एक कायदा केला. कोणत्याही सैनिकाला वीरमरण आल्यास त्याचं पार्थिव शासकीय इतमामात त्याच्या घरी पोहोचवलं जावं, असा निर्णय झाला. शहिदाच्या पार्थिवासोबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकही जवानाच्या घरी जातील, असंही या कायद्यात सांगितलं आहे. संरक्षण मंत्री असताना मुलायम सिंह यांनी सुखोई-३० या लढाऊ विमानाचा व्यवहार केला होता.