महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धक्का देत पक्षाचं नाव तसंच चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेना हे नाव आता दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेच्या इतिहासातील या आजवरच्या सर्वात मोठ्या घडामोडींवेळी खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवली गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत पत्राचाळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. संजय राऊत आता राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचं तुरुंगातूनच राजकीय घडामोडींवर लक्ष आहे. तुरुंगात दररोज सकाळी येणाऱ्या वर्तमान पत्रांच्या माध्यमातून संजय राऊत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
“आमच्यात शिवसेनेचं स्पिरीट आहे. भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ आणि सेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. चिन्ह गोठवण्याची वेळ अनेक पक्षांवर आलीय. आधी ज्यांचं चिन्ह गोठवलं गेलं ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ”, असं संजय राऊत म्हणाले.