महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० ऑक्टोबर । उद्धव ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे, तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीने निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सोमवारी निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे यांनी दिलेली तिन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने नाकारली असून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ३ नवे पर्याय देण्याचे आदेशही आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहेत.
धगधगती मशाल
हे चिन्ह समता पार्टीकडे होते. मात्र, २००४ मध्ये पक्ष संपुष्टात आल्याने ठाकरे गटाला धगधगती मशाल चिन्ह देण्यात आले.
गदा : नाकारले
धर्माशी निगडित असल्याने एकनाथ शिंदे गटाला गदा हे चिन्ह नाकारण्यात आले. ठाकरे गटानेही या चिन्हाचा पर्याय दिला होता.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर केले. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, पहिल्याच राजकीय डावपेचामध्ये उद्धव ठाकरे जिंकले असून आमचाच विजय झाला आहे.
उगवता सूर्य
दक्षिणेत द्रविड मुनेत्र कझगम पक्षाकडे उगवता सूर्य हे चिन्ह आधीपासून असल्याने दोन्ही गटांना हे चिन्ह आयोगाने नाकारले.
त्रिशूल
लाेकांच्या धार्मिक भावना असल्याने ठाकरे आणि शिंदे गटाला त्रिशूल चिन्ह देता येत नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
आयोगाच्या निर्णयाला सेनेचे आव्हान
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे म्हटले. दुसरीकडे शिंदे गटाला दिलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावालाही ठाकरे गटाने आक्षेप घेतला.
महाविकास आघाडी म्हणून अंधेरीत भाजपशी दोन हात
अंधेरीच्या पूर्व विधानसभा २०२२ पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (१० ऑक्टोबर) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पटोले यांनी अंधेरीत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराचा प्रचार करतील, निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील, अशी ग्वाही दिली. या पाठिंब्यावरून मिलिंद देवरा यांनी काँग्रेसने उमेदवार द्यावा, असे मत व्यक्त केले होते. दरम्यान, २०१९ मध्ये काँग्रेसच्या अमीन कट्टी यांनी २७ हजार मते घेतली होती.