महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमधील मुलाने अनुदानाची रक्कम लवकर मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी पत्र लिहिले. यात त्याने “सायेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करंल, तुम्ही बी खायला या…” अशी आर्त हाक दिली होती. याची दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयातून हिंगोली जिल्हा परिषदेत फोन खणखणला. अधिकाऱ्यांनी प्रतापच्या घरी गोरेगावला भेट दिली व समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे,समाजकल्याण अधिकारी राजेश एडके यांच्या पथकाने गावात पाहणी केली व घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची गोरेगावला भेट देत जि.प.च्या पथकाने प्रतापशी संवाद साधला यात तो हुशार असल्याचे अधिकाऱ्यांना जाणवले. खूप शिकून डॉक्टर होत रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्रतापला वसतिगृहात ठेवायची तयारी असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने दाखवली.