Ajay Hinge Patil: बेडवर झोपून १७ वर्षे पक्षाची सेवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमंतातील ध्रुवतारा निखळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे अजय हिंगे पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. अजय हिंगे हे एका अपघातात जखमी झाल्यामुळे ते तब्बल १७ वर्षे अंथरुणाला खिळून होते. मात्र, या काळात अजय हिंगे पाटील (Ajay Hinge Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाचे काम प्रभावीपणे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार, खासदारांनी केलेली कामं आणि पक्षाची एकंदर भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात अजय हिंगे पाटील यांचे मोठे योगदान होते. या सगळ्यामुळे अजय पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपासून आमदार-खासदार ते तळागाळातील कार्यकर्त्यांशी जवळीक होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियावरील प्रत्येक मोहीमेत अजय यांची भूमिका निर्णायक असायची. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तुळात अजय हिंगे पाटील यांची खास ओळख तयार झाली होती.

अजय हिंगे पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजय हिंगे पाटील यांना गेल्यावर्षी त्यांच्या वाढदिवशी खास व्हिलचेअर भेट दिली होती. त्यामुळे अजय हिंगे पाटील यांना थोडीफार हालचाल करणे शक्य झाले होते. अजय हिंगे पाटील यांच्या निधनाने आपल्या धक्का बसल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, माझे सहकारी मित्र अजयशेठ हिंगे पाटील यांचं दुःखद निधन झाल्याचं समजलं आणि मन सुन्न झालं! एका मित्राचं असं अवेळी जाणं मनाला वेदना देणारं आहे. अजयशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! या कठीण समयी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, अशा भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनीही अजय हिंगे पाटील यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. लढवय्या अजयशेठ.. अतिशय दुःखद.. भावपूर्ण श्रद्धांजली.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमंतातील एक ध्रुव तारा निखळला.. हे दुःख सहन होण्यासारखे नाही.. जीवनातील मोठ्या संघर्षाला सामोरे जाऊनही.. पुरोगामी विचारांचा प्रभावी प्रसार करणारे लढवय्ये व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून गेले यावर विश्वास बसत नाही.. १७ वर्षांपासून अंथरुणाला खिळून देखील मनाने चैतन्यपूर्ण जगणारा हा युवक, हजारो युवकांना प्रेरणा देऊन गेला. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस म्हणून त्यांनी निभावलेली जबाबदारी अतुलनीय आहे, असे अशोक पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *