पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना धक्का ; चांगल्या प्रतिसादानंतर ही १३ AC लोकल फेऱ्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला (एसी) प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असतानाच तब्बल १३ एसी लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने बुधवारी घेतला. या निर्णयामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीतून प्रवास करावा लागला. या फेऱ्या रद्द करण्यामागे पश्चिम रेल्वेकडून तांत्रिक कारण देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात राखीव वातानुकूलित लोकल नसल्यामुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना आणि कोणतेही ठोस कारण न देता फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी पासद्वारे एसी लोकलसाठी आगाऊ पैसे भरले आहेत. प्रवाशांच्या नुकसानाची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न प्रवासी कृष्णा पाटील यांनी उपस्थित केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी ट्वीटद्वारे, ‘बुधवारी धावणाऱ्या १३ वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या जागी सामान्य लोकल फेऱ्या धावणार आहेत’, अशी माहिती दिली. मात्र या फेऱ्या रद्द का करण्यात आल्या याबाबत या ट्विटरवरून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या ट्वीटला उत्तर देताना एसी प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वेकडे सहा एसी लोकल गाड्या आहेत. या सर्व लोकल प्रवासी सेवेत धावत आहेत. यामुळे राखीव लोकल नसल्याने संबंधित गाडी रद्द करण्यात आली आहे. परिणामी या गाडीच्या चर्चगेट ते विरार आणि बोरिवली-चर्चगेट लोकल फेऱ्या रद्द झाल्या, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांना याबाबत विचारले असता, तांत्रिक कारणास्तव लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आज, गुरुवारी एसी लोकल फेऱ्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील, असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *